प्रतिनिधी-किर्तिराज जाधव
प्रयत्नामध्ये सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते. या जोरावरच मी तब्बल 476 सुवर्ण पदके संपादन केली आहेत. जिंकायचे ध्येय ठेवून जीवनात कार्यरत राहा. सुवर्णपदकाचे ध्येय ठेवून खेळा, असे प्रतिपादन पद्मश्री मुरलीकांत पेटकर (चंदू चॅम्पियन) यांनी केले.
निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील कै. सौ. हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये पुणे विभागीय क्रीडा स्पर्धेस गुरुवारी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्याहस्ते प्रारंभ झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य, होमिओपॅथीक डीन डॉ. राजकुमार पाटील, सुकुमार मगदूम फौंडेशनचे चेअरमन डॉ. सुकुमार मगदूम प्रमुख उपस्थित होते.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, केंद्र व राज्य शासन यांच्यावतीने दोन दिवस या क्रीडा स्पर्धा होत आहेत. या क्रीडामहोत्सवामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि अॅथलेटिक्स या मुख्य पाच क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. तसेच स्पर्धेसाठी पुणे विभागामधून 5 जिल्ह्यातील 50 वैद्यकिय महाविद्यालयांचा समावेश आहे.
क्रीडा महोत्सवाच्या प्रारंभी हौसाबाई होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉ. शुभांगी मगदूम यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी ध्वजारोहण करण्यात आले तसेच क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले, विभागीय क्रीडा स्पर्धा निमशिरगाव सारख्या ग्रामीण भागात होत आहेत याचा आनंद आहे. आज ग्रामीण भागातील मुले क्रीडा स्पर्धेत यश संपादन करीत आहेत. स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळविले. त्यांच्या यशाला सलाम आहे. स्वप्ने मोठी बघा. जिद्दीने यशोशिखर गाठा. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवा. असे खेळा की कामगिरीची चर्चा झाली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
डॉ. सुकुमार मगदूम म्हणाले, हौसाबाई होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजला प्रथमच विभागीय स्पर्धा आयोजनाची संधी मिळाली. टीम वर्कमुळे शक्य झाले. राज्यातील विविध भागांतील विद्यार्थी येथे स्पर्धेच्या निमित्ताने आले.
याप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य, होमिओपॅथीक डीन डॉ. राजकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी हौसाबाई होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे कौतुक केले. हौसाबाई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग डायरेक्टर तेजस मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेसाठी आलेल्या पुणे विभागातील विविध महाविद्यालयाच्या खेळाडूंनी संंचलन केले. आभार हर्षवर्धन भोसले यांनी मानले.